राज्य सरकारकडून सहकार क्षेत्रातील गोकुळला सर्वतोपरी मदतीचे आश्वासन
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) चे नूतन चेअरमन नविद मुश्रीफ यांनी बुधवारी (११ जून २०२५) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या वेळी गोकुळच्या संचालक मंडळातील सदस्यही उपस्थित होते.
गोकुळच्या चेअरमनपदी निवड झाल्यानंतर मुश्रीफ यांची ही मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी प्रथम अधिकृत भेट होती. यावेळी मुख्यमंत्र्यांचा करवीर निवासिनी अंबाबाईची मूर्ती आणि गोकुळची उत्पादने देऊन सत्कार करण्यात आला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “गोकुळसारख्या सहकारी संस्थांच्या उद्योग विस्तारासाठी सरकारकडून आवश्यक ती सर्व मदत दिली जाईल.”
गोकुळतर्फे मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये –
मुंबई, नवी मुंबई, पनवेल, वाशी परिसरात नवीन दुग्ध शाळेसाठी औद्योगिक भूखंड उपलब्ध करणे,
पुण्यात नवे पॅकिंग स्टेशन उभारण्यासाठी भूखंड देणे,
म्हैस दूध उत्पादकांना प्रतिलिटर अनुदान मिळावे,
२०२५ पासून लागू झालेल्या सौर उर्जा मल्टीएअर टेरिफ पॉलिसीमध्ये शिथिलता आणणे,
अशा महत्त्वाच्या मागण्या होत्या.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या मागण्यांचा सकारात्मक विचार करून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठक घेण्याचे आश्वासन दिले. तसेच, गोकुळच्या स्वयंपूर्ण ऊर्जा आत्मनिर्भरतेसाठी राज्य सरकारचे सर्वतोपरी सहकार्य राहील, असेही ते म्हणाले.
या भेटीवेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके, जनसुराज्य युवाशक्ती प्रदेशाध्यक्ष समित कदम, गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, व संचालक मंडळाचे इतर सदस्य उपस्थित होते.