कोरोना महासंकटाच्या काळात डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर ने आपला संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोरोना रुग्णसेवेसाठी समर्पित केली. मोफत उपचार सुविधा, आपत्कालीन सेवा, आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा यामुळे हे हॉस्पिटल देशभरात चर्चेचा विषय ठरले होते. याच कार्याची दखल घेत ‘बेस्ट हॉस्पिटल विथ मेडिकल कॉलेज ऑफ द इयर’ हा राष्ट्रीय पुरस्कार केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार मुंबईतील हॉटेल ताज प्रेसिडेंट येथे पार पडलेल्या ८ व्या हेल्थ केअर समिट २०२५ मध्ये प्रदान करण्यात आला. डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त पृथ्वीराज संजय पाटील यांनी उपस्थित राहून हा पुरस्कार स्वीकारला. ‘नवभारत’ मीडिया ग्रुप तर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
२००३ मध्ये सुरू झालेल्या डी. वाय. पाटील हॉस्पिटलने गेल्या २२ वर्षांपासून लाखो रुग्णांना सवलतीच्या दरात दर्जेदार सेवा पुरविल्या आहेत. डॉ. संजय डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली हॉस्पिटलमध्ये सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार व तपासण्या, ग्रामीण भागात मोफत आरोग्य शिबिरे, रक्तदान मोहीम, यांसारखे उपक्रम राबवले जातात.
कोरोना काळात संपूर्ण हॉस्पिटलचा उपयोग कोरोना रुग्णांसाठी करण्यात आला. मोफत तपासणी आणि उपचार सेवा, आवश्यक तेथे ऑक्सिजन, आयसीयू सुविधा, आणि कोविड प्रतिबंधक उपाययोजना यामध्ये हॉस्पिटल आघाडीवर होते.
या गौरवाच्या क्षणी ‘नवभारत’चे संचालक वैभव माहेश्वरी, रुबी क्लिनिकचे सीईओ बेहराम खुदाई आदी मान्यवर उपस्थित होते.
या पुरस्कारामुळे डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे . कोल्हापूरच्या वैद्यकीय क्षेत्राचा सन्मानही उंचावला आहे.